बंगळुरु : "मी तुमची मनस्थिती जाणतो, पण निराश होऊ नका, देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे," अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित प्रत्येकाला धीर दिला. बंगळुरुमधील इस्रोच्या कंट्रोल सेंटरमध्ये पंतप्रधान मोदींना चांद्रयान 2 मोहीमेत आलेल्या अडचणीबद्दल देशाला संबोधित केलं.

लॅण्डर विक्रमशी संपर्क तुटला

अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चंद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटर जवळ जाऊन थांबली. चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला. पण अजूनही संपर्क होण्याची आशा कायम आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून डेटा विश्लेषणाचं काम सुरु आहे.

दरम्यान अद्याप भारताची ही मोहीम अयशस्वी ठरलेली नाही. लॅण्डरशी जरी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

इस्रो प्रमुख रडले, पंतप्रधानही भावुक 
पंतप्रधान मोदींना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी गेलेल्या इस्रो प्रमुखांना आपलं दु:ख लपवणं कठीण झालं आणि ते रडू लागले. यानंतर पंतप्रधानांनी त्यांची गळभेट घेऊन पाठ थोपटली आणि धीर दिला. पंतप्रधान गाडीत बसले आणि के सिवन यांनी त्यांना निरोप दिला.  परंतु सिवन यांचे डबडबलेले डोळे आणि चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती. तर पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरही काहीसे निराशेचे भाव होते.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक :  पंतप्रधान मोदी

या मोहीमेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती वेगळ्या मनस्थितीत आहे, अनेक प्रश्न होते, मोठ्या यशासोबत पुढे जात होता. अचानक काहीही दिसेनासं झालं, मी देखील तो क्षण तुमच्यासोबत जगलो :  पंतप्रधान मोदी

चंद्राला कवेत घेण्याची आपली इच्छाशक्ती आणि इरादा आणखी दृढ झाला आहे : पंतप्रधान मोदी

देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कुणी विसरु शकणार नाही : पंतप्रधान मोदी

तुम्ही लोण्यावर रेघ मारणारे नाही तर दगडावर रेघ लोक आहात :  पंतप्रधान मोदी

मी आधीही सांगितलंय, आताही सांगतो, मी तुमच्यासोबत आहे, देश तुमच्यासोबत आहे :  पंतप्रधान मोदी

चांद्रयान 2 चा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता :  पंतप्रधान मोदी

चांद्रयान 2 चा प्रवास शानदार, अनेक अडचणींतून यश मिळालं : पंतप्रधान मोदी

विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही : पंतप्रधान मोदी

अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, यासाठी वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान : पंतप्रधान मोदी

आपल्याला यश नक्कीच मिळणार, या मोहीमेच्या पुढच्या प्रयत्नातही आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नान यश आपल्यासोबत असेल  :  पंतप्रधान मोदी

चांगल्या कामासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न एक नवीन धडा शिकवतो, चांद्रयानाच्या माध्यमातूनही आपल्याला खूप शिकायला मिळालं : पंतप्रधान मोदी

लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही : पंतप्रधान मोदी

निकाल आपल्या जागी, पण मला आणि संपूर्ण देशाला आपल्या वैज्ञानिक, इंजिनिअरच्या प्रयत्नांचा अभिमान आहे :  पंतप्रधान मोदी