नवी दिल्ली : मध्य रेल्वेच्या कॅटरिंग विभागातील कथित घोटाळा समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने आरटीआय अंतर्गत ही बाब उघड केली आहे. मध्य रेल्वेचं कॅटरिंग विभाग तोट्यात चालत असल्याचं समजल्यानंतर अजय बोस यांनी माहिती मागवली होती. 'द हिंदू'च्या वृत्तानुसार रेल्वेच्या किचन गोदामासाठी खरेदी केलेल्या सामग्रीसाठी किरकोळ दरापेक्षा अव्वाच्या सव्वा दर मोजल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अजय बोस यांनी अर्ज दाखल करुन ही रेल्वेकडून ही माहिती मागवली. त्यांच्या अर्जावर उत्तर देताना रेल्वेने सांगितलं की, अमूलच्या एक किलो दह्यासाठी तब्बल 9 हजार 720 रुपये मोजण्यात आले आहेत. "मी जुलै 2016 मध्ये अर्ज दाखल केला होता. पण मध्य रेल्वेकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रेल्वे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आली. त्यानंतर मी पुन्हा अर्ज केला. अखेर संबंधित अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत माझ्या शंकेचं निरसन करण्याचे आदेश दिले. तरीही बरेच महिने उत्तर आलं नाही, असं अजय बोस यांनी 'द हिंदू'ला सांगितलं. "कॅटरिंग विभाग जाणीवपूर्वक माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष करत असल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा अर्ज दाखल केला. यावेळी मला तपशीलवार माहिती मिळाली, जी धक्कादायक होती," असं बोस यांनी सांगितलं. कॅटरिंग विभागाने 100 ग्राम दह्यासाठी 972 रुपये मोजले, बाजारात याची किंमत केवळ 25 रुपये आहे. इतकंच नाही तर रेल्वेने बऱ्याच वस्तू त्यांच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचं समोर आलं. याशिवाय मार्च 2016 मध्ये 58 लिटर शुद्ध तेल 72 हजार 034 रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. म्हणजेच एक लिटर शुद्ध तेल 1241 रुपयांत खरेदी करण्यात आलं. तसंच टाटा मीठाच्या 150 पाकिटांना 2670 रुपये मोजण्यात आले. एका पाकिटाची मूळ किंमत 15 रुपये आहे, परंतु रेल्वेने 49 रुपयांत एक पाकिट खरेदी केलं. तर पाण्याची बॉटल आणि सॉफ्ट ड्रिंकच्या एका बॉटल साठी रेल्वेने 59 रुपये दिले. तसंच चिकन, तूरडाळ, मूगडाळ, बेसन इतकंच नाहीतर टिश्यू पेपरही जास्त दराने खरेदी केल्याचं अजय बोस म्हणाले. खरेदी केलेल्या वस्तू सीएसटीच्या गोदामात ठेवल्या जातात आणि त्यानंतर आयआरसीटीसीच्या जन आहार कॅन्टिन, डेक्कन क्वीन, कुर्ला-हजरत निजामुद्दिन एक्स्प्रेसच्या कॅन्टिनला वितरित केले जातात.

वस्तू

प्रमाण

रुपये

किती मोजले

अमूल दही

15,336 युनिट्स

1,49,19,934.32

100 ग्राम - 972 रुपये

 

बोनलेस चिकन

650.5 किलो

1,51,586.00

 

एक किलो - 233 रुपये

 

तूरडाळ

570 किलो

89,610.00

एक किलो - 157 रुपये

 

मूगडाळ

148.5 किलो

89,610.00

एक किलो - 157 रुपये

 

शुद्ध तेल

53 लिटर

66,410.00

एक लिटर - 1253 रुपये

 

पाणी, सॉफ्ट ड्रिंक

178 बॉक्स

(प्रत्येकी 10 बॉटल)

1,06,031.04

एक बॉटल - 59 रुपये