नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. भाजप नेते आणि संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी ही माहिती दिली . ‘राहुल गांधींनी आपल्या भाषणादरम्यान खोटी माहिती देऊन संसदेची दिशाभूल केली, त्यामुळे राहुल गांधींविरोधात भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे,' असं अनंत कुमार यांनी म्हटलं आहे. हक्कभंगाच्या प्रस्तावावरील चर्चेमध्ये राहुल गांधींनी आक्रमक होत पंतप्रधान मोदींसह भाजपवर चौफेर टीका केली. राफेल विमान खरेदी प्रकरण, तरुणांना रोजगार, काळापैसा यासारख्या मुद्द्यांवरुन त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. त्यामुळे संसदेत मोठा गदारोळ झाला. ‘राहुल गांधींचं वय वाढलं आहे, मात्र अजून ते प्रगल्भ झाले नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी खूपच अपरिपक्व असून त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टीचं पुरेसं ज्ञान नाही,’ अशी घणाघाती टीका अनंत कुमारांनी केली आहे. दरम्यान, राहुल गांधींनी सरकारवर टीका केल्यानंतर पंतप्रधान मोदींची गळाभेट घेत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. “तुमच्यासाठी मी पप्पू असेन पण माझ्या मनात तुमच्याबद्दल थोडाही द्वेष नाही,” असंही राहुल गांधी म्हणाले.