नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठ्या निर्णयांचे फटाके फोडले आहेत. केंद्र सरकारकडून गहू, ज्वारी, हरभरा आणि सूर्यफुलासह रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 85 रुपये ते 325 रुपयांपर्यंत असणार आहे. देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने डबघाईला आलेल्या एमटीएनएल आणि बीएसएनलच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. विलिनीकरणानंतर जन्माला येणाऱ्या कंपनीसाठी बॉन्डच्या माध्यमातून 15 हजार कोटी, तर संपत्ती विक्रीतून 38 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. यापुढे 250 कोटींची उलाढाल असलेली कंपनी पेट्रोल आणि डिझेलची विक्री करु शकणार आहे. यापूर्वी 2500 कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्याच इंधनाची विक्री करु शकत होत्या.