सैन्याची मोठी कारवाई, दहशतवादी हामिद ललहारीचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम | 23 Oct 2019 11:43 AM (IST)
काश्मीर खोऱ्यात मूसा दहशतवादी संघटना चालवत होता, त्यावेळी हामिद ललहारी त्याचा सहकारी होता.
पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये भारतीय सैन्याला मंगळवारी (22 ऑक्टोबर) मोठं यश मिळालं. अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित 'अन्सार गजवत उल हिंद'चा म्होरक्या हामिद ललहारी उर्फ लोनला कंठस्नान घालण्यात आलं आहे. जून महिन्यात हामिदला 'अन्सार गजवत उल हिंद'चा नवा प्रमुख बनवण्यात आलं होतं. भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत हामिद ललहारीसह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. हामिद लोन, नवीद तक आणि जुनैद भट अशी अतिरेक्यांची नावं आहेत. सुरुवातीला पोलिसांनी तीन जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी असल्याचं म्हटलं जात होतं. यंदाच्या 24 मे रोजी पुलवामा जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या संयुक्त कारवाईत जाकिर मूसाला कंठस्नान घालण्यात आलं होतं. यानंतर हामिद ललहारीला नवा प्रमुख बनवण्यात आलं होतं. काश्मीर खोऱ्यात मूसा दहशतवादी संघटना चालवत होता, त्यावेळी हामिद ललहारी त्याचा सहकारी होता. मूसाच्या खात्म्यानंतर हामिद काश्मीर खोऱ्यात अतिरेकी कारवाया करत होता. स्थानिक तरुणांचा ब्रेनवॉश करुन त्यांच्या हातात बंदूक देण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतु त्याला यश मिळालं नाही. मूसाच्या गँगचा नायनाट मूसाने सुरु केलेल्या 10 अतिरेक्यांच्या टीममध्ये हामिदचाही समावेश होता. आता या संघटनेतील सगळ्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं जात आहे. हामिद ललहारी हा दक्षिण काश्मीरमधील एका गावात राहत होता. 2017 मध्ये एका चकमकीत बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर हामिद दहशतवादाच्या दुनियेत सामील झाला होता.