मुंबई : डिजिटल पेमेंट सुविधा देणारी कंपनी पेटीएमनं आपली ऑफलाईन पेमेंट सेवा सुरु केली आहे. पेटीएमनं एक टोल फ्री नंबर सुरु केला आहे. या नंबरच्या माध्यमातून ग्राहक आणि दुकानदारांना इंटरनेट नसतानाही पैसे पाठवता किंवा जमा करुन घेता येतील. तसंच आपला मोबाईल नंबर रिचार्जही करता येणार आहे.


पेटीएमची ऑफलाईन पेमेंट सुविधा सुरु करण्यासाठी ग्राहकांना आणि दुकानदारांना आपला मोबाईल नंबर पेटीएमसोबत रजिस्टर करावा लागणार आहे. सोबतच चार अंकांचा पेटीएम पिनही बनवावा लागणार आहे.

पेटीएमसोबत आपला नंबर रजिस्टर केल्यानंतर ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्याचा फोन नंबर आणि आपला पेटीएम पिन एन्टर करावा लागेल. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या पेटीएम वॉलेटमधील रक्कम दुसऱ्यांच्या पेटीएम वॉलेटमध्ये पाठवता येणार आहेत.

नोटाबंदीनंतर पेटीएमसह वेगवेगळ्या वॉलेटनी आपल्या सेवा ग्राहकांना पुरवल्या आहेत. गेल्या महिन्याभरात पेटीएम, फ्रीचार्च, ऑक्सिजनसारख्या वॉलेटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.