मुंबई: सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी घोषण केंद्र सरकारने केली असून आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. 30 जूनपर्यंत आता आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करता येणार आहे. या आधी ही मुदत 31 मार्च होती. आता ती वाढवण्यात आली आहे.
आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक करण्याची मुदत जरी वाढवली असली तरी दंड मात्र कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी त्यांचं आधार-पॅन अद्याप लिंक केलं नाही त्यांना 1000 रुपये भरून ते लिंक करता येणार आहे.
आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज आहे, त्याशिवाय अनेक कामे होऊ शकत नाहीत. विशेषत: रिटर्न आणि आयकर भरण्याशी संबंधित कोणतेही काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. या आधी आधार पॅन लिंक करण्याची मुदत ही 31 मार्च होती. अनेक लोकांचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक नाही. हे लिंकिंग करण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे सर्व्हर प्रॉब्लेमही होत असल्याच्या तक्रारी होत्या.
How to Link PAN-Aadhaar : पॅन, आधार कार्डसोबत (PAN Aadhaar Link) कसं लिंक कराल?
- आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे.
- या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
- वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
- यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
- तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस
आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.