नवी दिल्ली : महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसई (CBSE) बोर्ड परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, 17 फेब्रुवारी 2026 पासून या परीक्षा सुरू होणार आहेत. गेल्याच महिन्यात अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. आता, केंद्रीय परीक्षा बोर्डाने नियोजित वेळापत्रक जारी केलं आहे. विशेष म्हणजे परीक्षा (Exam) सुरू होण्याच्या तब्बल 110 दिवस आधी म्हणजेच चार महिन्यांपूर्वीच हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मोठा कालावधी मिळणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर cbse.gov.in विद्यार्थ्यांना विषयानुसार (CBSE Datesheet 2026 ) परीक्षेचं वेळापत्रक पाहता येईल. तसेच, येथून विद्यार्थी हे वेळापत्रक डाऊनलोडही करू शकतात. बोर्डाच्या नियोजित वेळापत्रकानुसार, सीबीएसई 10 वी परीक्षा 2026 यंदा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर, सीबीएसई 12 वी परीक्षा 2026 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. विषयानुसार परीक्षेसाठी नियोजित तारखेच्या दिवशी सकाळी 10:30 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 1:30 वाजेपर्यंत नियोजित करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीएसई बोर्डानुसार, 204 विषयांसाठी भारत आणि जगभरातील 26 देशांतून सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी 45 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. परीक्षेसह प्रात्यक्षिक, मुल्यांकन आणि निकालाचेही काम बोर्डाकडून करण्यात येते.
महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेचंही वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र स्टेट बोर्डानेही परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, 12 बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. कारण, 12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीच्या फेब्रु-मार्च 2026 च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत.
हेही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI