नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय संपामुळे पगारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची चिन्हं आहेत. 30 आणि 31 मे रोजी बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एटीएममध्येही खडखडाट असण्याची शक्यता आहे.


उच्च वेतनासाठी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी बुधवार 30 मे आणि गुरुवार 31 मे रोजी संप पुकारला आहे. सलग दोन दिवस बँकांचं कामकाज बंद राहिल्यास एटीएमवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महिन्याचा शेवटचा दिवस 'पगाराचा' असल्यामुळे तुम्हाला वेतन काढताना अडचणी येऊ शकतात.

बँकांचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सुरळीत सुरु राहणार असले तरी बँकांमधील व्यवहारांवर परिणाम होण्याची चिन्हं आहेत.

नऊ संघटनांचा समावेश असलेल्या 'युनायटेड युनियन फोरम ऑफ बँक युनियन' (यूएफबीयू)ने हा संप पुकारला आहे. इंडियन बँक असोसिएशन (आयबीए)ने प्रस्ताव दिलेल्या 2 टक्के इतक्या नाममात्र पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर काही बँक कर्मचारी निदर्शनं करणार आहेत.