नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार विरुद्ध सीबीआय असा हायव्होल्टेज ड्रामा सध्या सुरु आहे. अशी परिस्थिती असताना दिल्लीत ममतांच्या समर्थनात विरोधक एकवटल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
मोदी सरकारकडून लोकशाही संस्थांवर हल्ला सुरु असल्याचा सूर या बैठकीत उमटला. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन उपस्थित होते.
कोलकातामध्ये जे घटलं त्याकडे दुर्लक्ष केलं जावू शकत नाही. ममता बॅनर्जी यांच्यासोबत जे सुरु आहे, ते केजरीवाल यांच्यासोबतही झालं असल्याची टीका पवारांनी केली. कोलाकात्याला जाण्याबाबत अद्याप काही ठरलेलं नाही. काहीजण कोलकाताला जावू शकतात. पुन्हा एकदा सर्व विरोधकांसोबत बैठक होणार असल्याचंही पवारांनी सांगितलं.
कोलकात्यात ममता बॅनर्जी यांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. रविवारी सुरु केलेलं धरणं आंदोलन 8 फेब्रुवारीपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचं ममता यांनी आज जाहीर केलं आहे. तसेच आता जीव देईन पण तडजोड करणार नाही, टीएमसी नेत्यांना हात लावला तेव्हा काही बोलले नाही, पण कोलकाता पोलिसांच्या खुर्चीला हात लावाल तर शांत बसणार नाही, असं ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलं.
दरम्यान, रविवारच्या सर्व प्रकारानंतर सीबीआयनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. पश्चिम बंगाल राज्य सरकारचे सचिव, पोलीस महासंचालक आणि कोलकाता पोलीस आयुक्तांविरोधात सीबीआयकडून अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेशही देण्यात यावेत अशी मागणीही सीबीआयच्या वतीनं करण्यात आलीय. या प्रकरणाची उद्या पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्यावरुन सीबीआयने कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कारवाईपासून फक्त रोखलंच नाही, तर त्यांना बेड्या ठोकून पोलिस स्टेशनमध्ये नेलं. त्यानंतर सीबीआयच्या सर्व अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आलं असलं तरी दोन तपास यंत्रणा यानिमित्ताने आमनेसामने आल्या. या सर्व प्रकारामुळे कोलकात्यात सध्या एकप्रकारचा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावरुन सीबीआयने ही कारवाई केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी आपल्याला त्रास देत असून अजित दोभाल यांच्या इशाऱ्यावर ही कारवाई सुरु असल्याचंही ममतांनी म्हटलं आहे. वॉरंटविना पोलिस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची सीबीआयची हिंमतच कशी झाली? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.