नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआय सध्या एका वेगळ्याच संकटात आहे. सीबीआयने आपलेच विशेष संचालक आणि क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला क्रमांक एक आणि क्रमांक दोनचे अधिकारी असा वाद असल्याचंही बोललं जात आहे. सीबीआयचे टॉप बॉस आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातील वादाची किनार या प्रकरणाला असल्याची चर्चा आहे.

सीबीआयने अस्थाना यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अस्थाना यांनी मांस व्यापारी मोईन कुरेशीकडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे अस्थाना हेच कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत होते. अस्थाना यांनी स्वतःवरील आरोप फेटाळत यामध्ये आपल्याला फसवलं जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

अस्थाना यांच्यावर नेमका आरोप काय?

हैदराबादमधील उद्योगपती सतीश बाबू सना यांच्या तक्रारीवरुन सीबीआयने आपल्या संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकाऱ्यावर लाच घेतल्याचा ठपका ठेवला आहे. अस्थाना यांना गेल्या वर्षी जवळपास तीन कोटी रुपये दिल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. सना यांचा हा दावा सीआरपीसी कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यासमोर नोंदवण्यात आला, जो कोर्टालाही मान्य असेल.

मोईन कुरेशीकडून 50 लाख रुपये घेतल्याप्रकरणी सना हे देखील चौकशीच्या घेऱ्यात होते. या प्रकरणाच्या एसआयटीचं नेतृत्त्व अस्थाना यांच्याकडे होतं. सीबीआयचे विशेष संचालक आणि 1984 च्या बॅचचे गुजरात केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अस्थाना मांस व्यापारी कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुरेशीवर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारासह अनेक आरोप आहेत.

अस्थाना यांचं स्पष्टीकरण

अस्थाना यांनी सीव्हीसी म्हणजेच केंद्रीय सतर्कता आयोगाला पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे. सीबीआयच्या संचालकांनी अजय बस्सी नावाच्या एका अशा अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती केलीय, ज्याला नियम तोडण्यासाठी ओळखळं जातं. आपल्याला फसवण्यासाठी हा आरोप करण्यात आलाय, असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

अस्थाना यांच्याकडे अनेक हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी आहे. ज्यामध्ये ऑगस्टा वेस्टलँड चॉपर घोटाळा आणि उद्योगपती विजय मल्ल्या कर्ज प्रकरणाचाही समावेश आहे.