CBI Raids On Karti Chidambaram : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P.Chidambaram) यांचे पुत्र कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्या घरांवर सीबीआयनं (CBI) छापेमारी केली आहे. मुंबई, दिल्ली आणि तामिळनाडूमधल्या सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 2010 ते 2014 कालावधीत पैशांची बेकायदेशीर मार्गानं देवाणघेवाण केल्याच्या आरोपप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित प्रकरणातून सीबीआयनं पी. चिदंबरम यांच्या सात मालमत्तांवर छापे टाकले आहेत. मुंबई (Mumbai), दिल्ली (Delhi), चेन्नई (Chennai) आणि तामिळनाडूमधील सिवगंगई या चार शहरात या मालमत्ता आहेत. 2010 ते 2014 या कालावधीत कार्ती चिदंबरम यांनी पैशांची बेकायदेशीर मार्गानं देवाणघेवाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयनं आता कार्ती यांच्याशी संबंधित पी. चिदंबरम यांच्या मालमत्तांवर छापे टाकलेले आहेत.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध विविध फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिजा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे. तसेच, या व्हिजाच्या बदल्यात 50 लाख रुपये घेतल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावेळी त्यांचे वडील पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. 2011 सालची ही घटना आहे. दरम्यान, सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितलं आहे की, "आतापर्यंत ही छापेमारी किती वेळा झाली, हे मोजायला मी विसरलोय. नक्कीच हा एक विक्रम असेल."
2018 मध्ये कार्ती चिदंबरम यांना झाली होती अटक
आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्ती यांना अटक करण्यात आली होती. लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. चेन्नई विमानतळावरच सीबीआयकडून कार्ती यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला नेलं जाणार आहे. आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी परवानगी घेताना गैरप्रकार झाल्याचा कार्ती यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते.