वाराणसी : अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त लेखाप्रकरणी त्याच्याविरोधात जनहित याचिका वाराणसीत दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या शिवपूरमधील वकील कमलेश चंद्र त्रिपाठी यांनी ही याचिका दाखल केली आहे.


त्रिपाठी यांनी कमल हसनच्या तामिळ साप्ताहिकात प्रकाशित लेखावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच हिंदू संघटनांना दहशतवादी संघटना संबोधल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.

स्थानिक न्यायालयाने ही याचिक दाखल करुन घेतली असून, या प्रकरणी 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारी असलेल्या कमल हसनचा नुकताच तामिळ भाषिक साप्ताहिक आनंदा विकटनमध्ये एक लेख प्रकाशित झाला. या लेखात त्याने उजव्या विचारसरणीच्या संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळत असल्याचं म्हटलं होतं.

त्याच्या या लेखावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक राकेश सिन्हा यांनी कमल हसनने जाहीर माफी मागवी, अशी मागणी केली होती. तर भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही कमल हसनवर टीकेची झोड उठवली होती. दुसरीकडे अखिल भारतीय हिंदू महासभेने कमल हसनला गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, कमल हसनने या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना, हिंदुत्ववादी संघटनावर निशाणा साधला आहे. “जर आम्ही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत असून, तर ते आम्हाला देशद्रोही ठरवतात. त्यानंतर आम्हाला अटक करुन तुरुंगात पाठवलं जातं. पण आता तुरुंगातही जागा नसल्याने, ते आता थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा करत आहेत.”

संबंधित बातम्या

'हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळतोय', कमल हसनचा वादग्रस्त लेख