'हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद बोकाळतोय', कमल हसनचा वादग्रस्त लेख
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2017 10:11 PM (IST)
दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारी असलेल्या कमल हसनने लिहिलेल्या एका लेखाने मोठा वाद निर्माण झाला आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला असल्याचा थेट आरोप अभिनेते कमल हसन यांनी केला आहे
नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारी असलेल्या कमल हसनने लिहिलेल्या एका लेखाने मोठा वाद निर्माण झाला आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला असल्याचा थेट आरोप अभिनेते कमल हसन यांनी केला आहे. कमल हसनने तामिळ भाषिक साप्ताहिक आनंदा विकटनमध्ये लेख लिहिला आहे. या लेखात कमल हससने म्हटलंय कि, "उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदूत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला. त्यामुळे लोकांची 'सत्यमेव जयते'वरील आस्था संपली आहे." या लेखानंतर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कमल हसनविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते राकेश सिन्हा यांनी कमल हसनकडून जाहीर माफीनाम्याची मागणी केली आहे. राकेश सिन्हा यांनी ट्वीट करुन म्हटलंय कि, "हिंदुत्वाला शिव्या देऊन राजकारणात यशस्वी होण्याचा युगाचा अस्त झाला, हे कमल हसनला समजलं नाही. त्याने आपल्या वादग्रस्त टीप्पणीबद्दल सर्वांची माफी मागितली पाहिजे." तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामींनी कमल हसनवर टीकेची झोड उठवली आहे. स्वामी म्हणाले कि, "कमल हसनचं करीअर आता संपलं आहे. त्याला आता तामिळनाडूमध्ये कोणीही गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळेच कम्युनिस्टांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन केरळमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची नुकतेच प्रदर्शित झालेले तिन्ही सिनेमे फ्लॉप झाले." दरम्यान, आत्तापर्यंत केरळमध्ये संघ आणि भाजपशी संबंधित शंभरपेक्षा आधिक जणांची हत्या झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी काही दिवसांपूर्वी केरळमध्ये आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात विरोधीपक्ष कमल हसनला राजकीय आखाड्यात उतरु पाहात आहेत. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची कमल हसनने भेट घेऊन त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वादही घेतला होता.