नवी दिल्ली : सीमेपलिकडे चीनच्या कुरापती सुरु असताना भारताला चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. भारताकडे फक्त 10 दिवस पुरेल इतकाच दारु-गोळा असल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे.


चीन आणि पाकिस्तानसोबत भारताचे संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कॅगनं भारतीय लष्कराकडील युद्धसामुग्रीच्या कमतरतेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

युद्धपरिस्थिती उद्भवल्यास लष्कराकडे किमान 40 दिवस पुरेल इतकी युद्धसामुग्री आवश्यक असते. भारतीय लष्कराकडे मात्र केवळ दहा दिवसांचा साठा असल्याची माहिती कॅगनं संसदेत दिली.

याशिवाय निकृष्ट दर्जाच्या युद्धसामुग्रीवरही कॅगनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सुमार शस्त्रास्त्रांमुळे शस्त्रसाठ्याला आग लागण्याच्याही घटना घडत असल्याचं कॅगनं सांगितलं. याआधी 2015 मध्येही कॅगनं अपुऱ्या युद्धसामुग्रीबद्दल अहवाल सादर केला होता.