दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या खाण्यावर कॅगनं ताशेरे ओढले आहेत. रेल्वेत प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखली जात नसल्याचं कॅगनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.


रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे बेस किचन रेल्वे स्टेशनपासून लांब असतात. या किचनमध्ये क्वॉलिटी चेक करण्याची कोणतीही सोय नसते. त्यामुळे रेल्वेतील खाणं क्वॉलिटी आणि स्वच्छतेच्या मानकांची पूर्तता करत नाही असं कॅगनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

तीन वर्षांमागे रेल्वेनं प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार खाणं दिलं जाईल असं म्हणत जनता मील देण्यास सुरुवात केली होती. मात्र गेल्या तीन वर्षांत सातत्यानं या जनता मीलच्या गुणवत्तेत घसरण झाली असल्याचं कॅगनं म्हटलं आहे, तसंच पुरेशा प्रमाणात हे खाद्यपदार्थ स्टेशनवर उपलब्ध नसल्याचाही ठपका कॅगनं रेल्वेवर ठेवला आहे.

रेल्वे स्टेशनवर पुरवल्या जाणाऱ्या जनता मीलबद्दल कोणतीही माहिती प्रवाशांना दिली जात नाही, तसंच त्याच्यावर कोणतीही माहिती लिखित स्वरुपात दिली जात नाही असं कॅगनं म्हटलंय. तसंच बाजारभावापेक्षा जास्त किंमतीत कमी खाणं दिलं जात असल्याचंही कॅगच्या रिपोर्टमधून समोर आलं आहे. रेल्वेत पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या काही तक्रारी असल्यास त्यासाठी तक्रार केंद्रही बनवण्यात आली आहेत, मात्र त्या केंद्रामध्येही तक्रारींचं निराकरण होत नसल्याचं कॅगनं म्हटलं आहे.