दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्राची मंजुरी
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2017 09:50 PM (IST)
247.5 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचं काम येत्या पाच वर्षात पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
प्रातिनिधीक फोटो
नवी दिल्ली : दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक दरम्यान मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनच्या सुरळीत वाहतुकीसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक बाबींविषयीच्या मंत्रिमंडळ समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिली. याचा अंदाजे खर्च 2081.27 कोटी रुपये असून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत 2330.51 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 247.5 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचं काम येत्या पाच वर्षात पूर्ण होण्याचा अंदाज आहे. दौंड-मनमाड मार्गाच्या दुपदरीकरणामुळे पॅसेंजर ट्रेन आणि मालवाहतूक सहजतेने होऊन रेल्वे महसूलात वाढ होईल, अशी आशा रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केली आहे. दौंड-मनमाड मार्गाभोवती असलेल्या उद्योगांनाही दुपदरीकरणाचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यांना लाभ होईल, असं रेल्वेतर्फे म्हणण्यात आलं आहे. सध्या मुंबई-चेन्नई मार्गावर भिगवण-मोहोळ आणि होतगी-गुलबर्गाच्या दुपदरीकरणावर रेल्वेतर्फे काम सुरु आहे. लोणद-फलटण-बारामती मार्गावरील नव्या लाईनचं कामही सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर दौंड-मनमाड भागातील रेल्वे वाहतूक प्रचंड वाढेल. एकेरी मार्गावर वाहतुकीचा बोजा सहन होणार नाही. त्यामुळे दुपदरीकरणाची गरज असल्याचं रेल्वेने स्पष्ट केलं.