Bypolls Results 2022 : उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा जागेसाठीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकेकाळी समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांचा हा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार असीम राजा यांचा पराभव केला आहे. घनश्यासिंग लोधी यांनी सपा उमेदवाराचा 42 हजार 48 मतांनी पराभव केला. तसेच दुसरीकडे दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आम आदमीचे उमेदवार दुर्गेश पाठक 11 हजार 555 मतांनी विजयी झाले आहेत.


राजेंद्र नगर विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेले राघव चड्ढा यांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजप आम आदमी पक्षाला कडवी टक्कर देताना दिसत होते. मात्र चार फेऱ्यानंतर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली. त्यानंतर आता आमदार दुर्गेश पाठक विजयी झाले आहेत.





आज देशातील 3 लोकसभेच्या आणि 7 विधानसभेच्या जागांचा निकाल जाहीर होणार होता. यापैकी 1 लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागेचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर आणि आझमगढ येथे तर पंजाबमधील संगरुर लोकसभा जागेवर पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान झाले होते. तर त्याचवेळी दिल्ली, झारखंड, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या राज्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक लागली होती.  या पोटनिवडणुकींचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीत उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर या महत्त्वाच्या जागा मानल्या जात होत्या. पण अखेर रामपूरच्या जागेवर भाजपने बाजी मारली आहे. 


या जागा झाल्या होत्या रिक्त


भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची संगरुरची जागा रिक्त झाली होती. तसेच आझम खान यांनी देखील लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रामपूरची जागा रिक्त झाली होती. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव हे आझमगडमधून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दिल्लीच्या राजेंद्र नगर, झारखंडच्या मंडारी आणि आंध्र प्रदेशच्या आत्मकूर विधानसभेसाठीही मतदान झाले होते. राघव चढ्ढा यांच्या राजीनाम्यामुळे राजेंद्र नगरची जागा रिक्त झाली होती. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चढ्ढा यांनी पदाचा राजीनामा दिला होता.