Bypoll Election Result 2022 : देशात चार विधानसभा आणि  लोकसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. भाजपला सर्व पाचही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगडमध्ये पोटनिवडणूक झाली होती. त्याची आज मतमोजणी झाली. त्यात भाजपला धक्का बसला आहे. लोकसभेत भाजपचे बळ एकने कमी झाले आहे. तर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार संख्येत एकाची भर पडली आहे.


पश्चिम बंगालमध्ये दीदीचा जोर


पश्चिम बंगालमध्ये आसनसोल लोकसभा आणि बालीगंज विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक झाली. आसनसोल लोकसभेतून निवडून गेलेले खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तर बालीगंज विधानसभेच्या आमदारांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. तृणमूल काँग्रेसने भाजपचे माजी खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांना भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचे आव्हान होते. शत्रुघ्न सिन्हा यांना दुपारी दोन वाजेपर्यंत 5 लाख 45 हजार 818 मते मिळाली. तर, भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांना  3 लाख 15 हजार 283 मते मिळाली. तिसऱ्या स्थानावर असलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पार्थ मुखर्जी यांना 73, 808 मते मिळाली. शत्रुघ्न सिन्हा यांनी विजयी आघाडी घेतली आहे. 


तर, बालीगंज विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार बाबुल सुप्रीयो यांनी 20 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. बाबुल सुप्रीयो यांना 50 हजार 722 मते मिळाली. तर, दुसऱ्या स्थानावर असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार सायरा शाह हलीम यांना 30 हजार 818 मते मिळाली. भाजप उमेदवाराला 12 हजार 967 मते मिळाली. 


बिहारमध्ये राजदचा विजय


बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बोचहां विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार अमर कुमार पासवान यांनी विजयी झाले आहे. त्यांच्या समोर भाजप उमेदवाराचे आव्हान होते. अमर पासवान यांनी भाजप उमेदवार बेबी कुमारी यांचा 36 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. राजद उमेदवार अमर पासवान यांना 82 हजार 562 मते मिळाली. 


छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडे निर्णायक आघाडी 


छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसला निर्णायक आघाडी मिळाली आहे.  खैरागड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या 14 व्या फेरीनंतर काँग्रेस उमेदवार 14 हजार 72 मतांनी आघाडीवर आहे. पुढील वर्षी छत्तीसगड विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने आजची पोटनिवडणूक महत्त्वाची समजली जाते. 


महाराष्ट्रात काँग्रेसचा विजय 


संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा 18,901 मतांनी विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.