मुंबई : फ्री वस्तुंचा मोह कोणाला नसतो? एखाद्या वस्तूच्या खरेदीवर दुसरी वस्तू फ्री मिळत असेल, तर खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढतो. मात्र प्रस्तावित जीएसटी (गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स) मुळे 'बाय वन गेट वन फ्री'ला चाप बसण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून जीएसटी लागू होणार आहे. मॉडेल जीएसटी कायद्याच्या एका तरतुदीनुसार मोफत वस्तूवरही कर आकारला जाऊ शकतो. पैसे न आकारता दिल्या जाणाऱ्या वस्तूंना जीएसटी मॉडेल लॉमध्ये करपात्र करण्यात आलं आहे. त्यामुळे वस्तूच्या प्रमोशनसाठी दिले जाणारे फ्री सॅम्पल्सही जीएसटीच्या अखत्यारित येण्याची शक्यता आहे.
फ्री गिफ्टवर कुठल्याही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट जीएसटीच्या माध्यमातून कंपन्यांच्या सेल्स आणि मार्केटिंग खर्चावर परिणाम होऊ शकतो. हा प्रकार व्हॅटपेक्षा वेगळा असून उत्पादन किंवा विक्रीवर कर आकारण्याऐवजी पुरवठ्यावर कर आकारतो. त्यामुळे मोफत वस्तू देऊन कराच्या भानगडीत पडण्यापेक्षा कंपन्या या ऑफर्स न देण्याची शक्यता अधिक आहे.