जयपूर : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. एखाद दुसऱ्यांदा आलेलं अपयश ही सामान्य बाब आहे. मात्र दहावीच्या परीक्षेत 47 वेळा नापास होणाऱ्या विद्यार्थ्याची गोष्ट तुम्ही कधी ऐकली आहे का?
राजस्थानच्या बहरोड भागात राहणारा एक अवलिया दहावीच्या परीक्षेत तब्बल 47 वेळा नापास झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण परीक्षेत पास होत नाही तोपर्यंत आपण लग्न करणार नाही अशी शपथ त्याने घेतली आहे. त्यामुळे 82 वर्षीय शिवचरण यांच्यावर अद्याप अविवाहित राहण्याची वेळ आली आहे.
आपल्या या आगळ्या वेगळ्या शपथेशी निष्ठा बाळगत शिवचरण यांनी आतापर्यंत लग्न केलेलं नाही. कोशिश करने वालो की हार नही होती, या धर्तीवर शिवचरण यांनी आपली उमेद सोडलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या दुर्दैवावर वाईट वाटून घ्यावं की त्यांच्या जिद्दीला सलाम करावा असाच प्रश्न इथल्या स्थानिकांना पडलाय.