मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी ऑनलाईन द्वेष आणि गुंडगिरी थांबवण्याचे आवाहन केलं आहे. सर्वांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, कारण या वर्षात अनेक आव्हानं आपल्या समोर आहे, असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. इंस्टाग्रामवर रतन टाटा यांनी ही पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यंदाचं वर्ष विविध आव्हानांनी भरलेलं आहे. ऑनलाईन माध्यमांवरील लोक एकमेकांना त्रास देत असल्याचे मला पाहायला मिळत आहे. एकमेकांना खाली खेचणं, टोकाची भूमिका घेणं आणि पटकन एखाद्याबद्दल मत बनवणं असे प्रकार होत आहेत, असं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. हे वर्षी आपण पूर्वीपेक्षा जास्त चांगल्यापद्धतीने एकत्र राहत एकमेकांना मदत करण्याचं आहे. एकमेकांना खाली खेचण्याचा हा वेळ नाही, असंही रतन टाटा यांनी म्हटलं आहे.
एकमेकांच्या प्रति अधिक संवेदनशीलतेचा आग्रह करत एकमेकांना आधार देणे, अधिक समजूतदारपणा आणि धैर्याची आवश्यकता असल्याचे रतन टाटा यांनी म्हटलं. मी सोशल मीडियावर फार नसतो. मात्र मला अपेक्षा आहे की सोशल मीडिया प्रामाणिकपणाचे स्थान म्हणून विकसित होईल आणि द्वेष आणि गुंडगिरीऐवजी याठिकाणी प्रत्येकाला पाठिंबा मिळेल, असं रतन टाटा यांनी म्हटलं.