Delhi Flood: दिल्लीतील मुसळधार पावसानंतर यमुनेच्या (Yamuna Flood) पाण्याची पातळी वाढली. दिल्लीला जोडणारे अनेक महत्त्वाचे रस्ते, घरं पाण्याखाली गेले आहेत. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. बचाव पथकांकडून अनेक जणांना बाहेर काढण्यात आलं, अनेक जणांना स्थलांतरित करण्यात आलं. या संकटातून माणूस कसाबसा सुटला असला तरी अनेक प्राणी त्यात अडकून पडले आहेत. दरम्यान, एनडीआरएफच्या टीमने नुकतीच पुरात अडकलेल्या 'प्रीतम' नावाच्या बैलाची सुटका केली आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.


या बैलाची किंमत तब्बल एक कोटी रुपये आहे आणि यामुळेच सध्या या घटनेची चर्चा होत आहे. दिल्लीत आपत्ती बचाव पथकांकडून नोएडामध्ये अडकलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. प्राण्यांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी नेलं जात आहे. जलमग्न भागातून सुरक्षित स्थळी आणलेल्या प्राण्यांमध्ये 'प्रीतम' प्रजातीचा एक बैल आहे, त्याची किंमत BMW पेक्षा जास्त आहे, म्हणजे तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक आहे. NDRF च्या पथकाने यासंबंधित माहिती शेअर केली आहे.


NDRF च्या पथकाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात दोन म्हशी आणि एका बैलाची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात येत आहे. पुराच्या पाण्यातून जाताना बोटीच्या दोन्ही बाजूला कर्मचाऱ्यांनी या 3 प्राण्यांना पकडून ठेवलं आहे. हे प्राणी पुराच्या पाण्यात अडकले होते. नोएडातील यमुना नदीच्या काठची सुमारे 550 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे आणि यामुळे 5 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहे आणि आठ गावं प्रभावित झाली आहेत.


गाझियाबादमधील एनडीआरएफ 8व्या बटालियनने गुरं आणि शेळ्यांना वाचवणाऱ्या टीमचे काही फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केले आहेत. गाझियाबादच्या एनडीआरएफच्या टीमने नोएडा येथून 1 कोटी रुपये किमतीच्या बैलाचे प्राण वाचवून त्याला सुरक्षित स्थळी पाठवलं आहे, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा आहे.






मिळालेल्या माहितीनुसार एनडीआरएफने गुरुवारपासून कुत्रे, ससे, कोंबडा आणि गिनी डुकरांसह सुमारे 6 हजार प्राण्यांना बुडीत भागातून सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. 45 वर्षांचा विक्रम मोडत नदीच्या पाण्याची पातळी यंदा 207.68 मीटरवर आली आहे.


हेही वाचा:


PM Modi Dubai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर, अबुधाबीमध्ये IIT दिल्लीचे कॅम्पस स्थापन्यास मंजुरी