Session of Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु होत आहे. दरम्यान, आज वादग्रस्त गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक, 2022 (Criminal Procedure Identification Bill) लोकसभेत चर्चेनंतर मंजूर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक कनिष्ठ सभागृहात मांडताना विरोधकांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यानंतर यासंदर्भात मतदान करावं लागलं होतं. दरम्यान, या विधेयकात दोषी गुन्हेगार आणि गुन्हेगारांची ओळख पटण्यासाठी बोटांचे ठसे, पायाचे ठसे आणि जैविक नमुने (जसे की रक्त) देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक, 2022 या विधेयकावरील चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उत्तर देऊ शकतात. दुपारी दोन वाजता चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, हे संविधानाच्या विरोधात आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. दरम्यान, या आठवड्यात विरोधक महागाईच्या मुद्यांवर देखील चर्चा करण्याची मागणी करु शकतात.


दरम्यान, आज संसदेच्या वरच्या सभागृहात म्हणजेच राज्यसभेत विरोधी पक्ष पुन्हा एकदा महागाईवर चर्चेची मागणी करु शकतात. याशिवाय जनरल व्ही के सिंह नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी संबंधित कामाचा तपशील सभागृहाच्या पटलावर ठेवतील. अजय भट्ट केंद्रीय गृह मंत्रालयाशी संबंधित कामाचा तपशील ठेवतील. याशिवाय पोलाद, खाणकाम, एमएसएमई, गृहनिर्माण, पेट्रोलियम आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्रीही त्यांच्या मंत्रालयांच्या कामाशी संबंधित तपशील सादर करणार आहेत. SC/ST कल्याण समितीचा अहवाल देखील  सादर केला जाईल. ज्यामध्ये PSU, खासगी क्षेत्र आणि कंत्राटी नोकऱ्या आणि LIC इत्यादींमध्ये या समुदायांच्या आरक्षणाच्या समस्यांवर अभ्यास केला गेला आहे. एमएसएमई क्षेत्रावर कोविडचा प्रभाव आणि सरकारने केलेल्या कारवाईचा अहवाल सादर केला जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन चार्टर्ड अकाउंटंट्सबाबत सुधारणा विधेयक मांडणार आहेत. अर्जुन मुंडा अनुसूचित जमाती दुरुस्ती विधेयक सादर करणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: