दिल्ली : वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, भाजपने निवडणुकीतील विजयानंतर महागाई आणखी वाढवत जनतेची लूट सुरु केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी दावा केला आहे की, मोदी सरकारने 1 एप्रिलपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्यानंतर सर्वसामान्यांवर सव्वा लाख कोटींचा बोजा पडणार आहे.


रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, गेल्या 12 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात दहा वेळा वाढ करण्यात आली आहे. यावेळी पेट्रोलच्या दरात 7.20 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांनी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 250 रुपयांनी वाढ झाली आहे. सीएनजी, पीएनजी, डीएपी खते, औषधे, स्टील इत्यादींच्या वाढलेल्या किमती, टोलमध्ये वाढ, पीएफ खात्यावरील करामधील वाढ यामुळे सर्वसामान्यांवर 1.25 लाख कोटींचा बोजा पडणार असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला.


वाढलेल्या महागाईनंतरही काँग्रेसला निवडणुकीत अपयश आल्याच्या प्रश्नावर सुरजेवाला यांनी निशाणा साधत म्हटलं आहे की, भाजप जातीय राजकारण करून लोकांना मूर्ख बनवून निवडणुका जिंकते आणि त्यानंतर महागाई वाढते. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान महागाईच्या बाबतीत धर्मनिरपेक्ष आहेत.


भाजप सरकारवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस 'महागाईमुक्त भारत' अभियान राबवत आहे. 31 एप्रिल रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी संसद भवनाबाहेर धरणे आंदोलन केले. सोमवारी लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha