लखनौ : घराणेशाहीपासून दूर असलेल्या बहुजन समाज पक्षामध्येही आता घराणेशाहीचा प्रवाह सुरु झाला आहे. मायावतींनी आपल्या भावाला बसपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी तर भाच्याची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. मायावतींचे बंधू आनंद कुमार यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष तर मायावतींसोबत हल्ली अनेकदा बसपाच्या मंचावर दिसणारे त्यांचे भाचे आकाश आनंद हे राष्ट्रीय समन्वयक असतील.


लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच बसपाची मोठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत पक्ष आणि कार्यकारिणीच्या संदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले. यामध्ये मायावतींचे भाचे आकाश आनंद यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. देशभरात पक्ष संगठन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. बसपाच्या कॅडरमध्ये राष्ट्रीय समन्वयक हे पद सर्वात महत्वाचे मानले जाते.

या बैठकीत उत्तर प्रदेशसह देशभरातील राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, राज्य प्रभारी तसेच ज्येष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते.  उत्तर प्रदेशमध्ये 12 विधानसभांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर मैदानात उतरणार आहे.

या महत्वाच्या बैठकीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिजवळील मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते. एवढंच नाही तर उपस्थितांच्या बॅगची चावी आणि कारच्या चाव्या तसेच पेन देखील बैठकीच्या हॉलबाहेर काढून घेण्यात आले होते.

लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष 'महागठबंधन' करून एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत समाजवादी पक्षाला पाच तर बहुजन समाज पक्षाला दहा जागांवर समाधान मानावे लागले.

अखिलेश यादवांसोबत 'महागठबंधन' ही माझी चूक होती : मायावती
या बैठकीत समाजवादी पार्टीसोबत 'महागठबंधन' करणे आमची सर्वात मोठी चूक होती,असा खळबळजनक दावा बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी केला. यावेळी मायावतींनी अखिलेश यांच्या राजकीय विचारांवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाला देखील मायावती यांनी अखिलेश यांनाच जबाबदार धरले आहे. ताज कॉरिडॉरच्या केसमध्ये मला अडकविण्यात भाजप आणि मुलायम सिंग यांचा हात असल्याचा आरोप देखील मायावतींनी यावेळी केला.

समाजवादी पक्षाने त्यांच्या प्रचारात आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच त्यांना दलित आणि मागासवर्गीयांनी मतं दिली नाहीत, असेही मायावती म्हणाल्या. बसपाचे प्रदेशअध्यक्ष आरएस कुशवाहा यांना सलीमपूरमधून समाजवादी पार्टीचे नेते राम गोविंद चौधरी यांनीच पराभूत केलं. त्यांनी समाजवादी पक्षाची मतं भाजपकडे वळविली. मात्र तरीही अखिलेश यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मायावती यांनी केला.