नवी दिल्लीः समाजवादी पार्टीसोबत 'महागठबंधन' करणे आमची सर्वात मोठी चूक होती,असा खळबळजनक दावा बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी दिली आहे.  मायावतींनी बसपा बैठकीत हे वक्तव्य केल्यानंतर बसपाचे नेते देखील आश्चर्यचकित झाले.


लखनऊमध्ये बसपाच्या बैठकीत मायावतींनी मुलायम सिंग आणि अखिलेश यादवांवर अनेक गंभीर आरोप देखील केले.  यावेळी मायावतींनी अखिलेश यांच्या राजकीय विचारांवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाला देखील मायावती यांनी अखिलेश यांनाच जबाबदार धरले आहे. ताज कॉरिडॉरच्या केसमध्ये मला अडकविण्यात भाजप आणि मुलायम सिंग यांचा हात असल्याचा आरोप देखील मायावतींनी यावेळी केला.

समाजवादी पक्षाने त्यांच्या प्रचारात आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळेच त्यांना दलित आणि मागासवर्गीयांनी मतं दिली नाहीत, असेही मायावती म्हणाल्या. बसपाचे प्रदेशअध्यक्ष आरएस कुशवाहा यांना सलीमपूरमधून समाजवादी पार्टीचे नेते राम गोविंद चौधरी यांनीच पराभूत केलं. त्यांनी समाजवादी पक्षाची मतं भाजपकडे वळविली. मात्र तरीही अखिलेश यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप मायावती यांनी केला.

मायावती म्हणाल्या की, लोकसभेचे निकाल आल्यानंतर अखिलेश यांनी मला कधीच फोन केला नाही. मीच त्यांना मतमोजणीच्या दिवशी फोन करून त्यांच्या परिवाराच्या पराभवाबद्दल दुःख व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत अखिलेश यांच्या पत्नी कन्नोजमधून तर अखिलेश यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र यादव आणि अक्षय यादव यांना देखील पराभवाचा  सामना करावा लागला होता.  यावर मायावती म्हणाल्या की, अखिलेश यांच्या सरकारच्या काळात दलितांवर झालेल्या अत्याचारांमुळेच त्यांचा पराभव झाला.

मायावती म्हणाल्या की, यादवांनी देखील आपली मतं समाजवादी पक्षाला दिलेली नाहीत. जर मतं दिली असती तर अखिलेश यांच्या परिवारातील सदस्य पराभूत झाले नसते.  शिवपाल यादव यांच्या पक्षामुळे यादवांच्या मतांचे विभाजन झाल्याचे देखील मायावती म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष 'महागठबंधन' करून एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत समाजवादी पक्षाला पाच तर बहुजन समाज पक्षाला दहा जागांवर समाधान मानावे लागले.