नवी दिल्ली : सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्याने बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सहारनपूर हिंसेबाबत बोलण्यास संधी न दिल्यास राजीनाम्याची मायावतींनी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी अखेर सभापतींकडे राजीनामा सुपूर्द केला.
पुढील वर्षी एप्रिलमध्ये मायावती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपणार होता.
राज्यसभेच्या सभापतींना तीन पानांचं पत्र लिहून मायावतींना राजीनामा सुपूर्द केला. मात्र, मायावतींचा राजीनामा मंजूर केला जाणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.
मी ज्या समाजातून येते, त्यांचेच मुद्दे मला सभागृहात मांडता येत नसतील, तर काय उपयोग?, असे मायावती यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.
उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा मायावती राज्यसभेत उपस्थित करु पाहत होत्या. मात्र, त्यांच्या मनानुसार त्यांना बोलण्यासाठी संधी दिली गेली नाही. त्यामुळे त्या नाराज होत्या. शिवाय, या नाराजीतच त्यांनी राजीनाम्याची धमकीही दिली होती.