नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीत बसपाच्या उमेदवाराच्या पराभवानंतर बसपा अध्यक्षा मायावती यांनी भाजवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच, या निकालानंतरही सपा आणि बसपामधील युती अभेद्य राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.


राज्यसभेच्या निवडणूक निकालानंतर मायावतींनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी भाजपवर मतं फोडल्याचा आरोप केला. तसेच सरकारी यंत्रणांचा वापर करुन, आमदारांना धमकावण्यात आले, आणि अनिल अग्रवाल यांना विजयी केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

गेस्ट हाऊसकांडचा उल्लेख करुन मायावती म्हणाल्या की, “ सध्या भाजपकडून 2 जून 1995 च्या गेस्ट हाऊसकांडाची आठवण करुन दिली जात आहे. वास्तविक, हे हत्याकांड म्हणजे षडयंत्र होतं. या घटनेतील दोषी पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या पदावर बढती देऊन भाजपला काय सिद्ध करायचं आहे? त्यांना आमचीदेखील हत्या करायची आहे का?” असा थेट सवाल मायावतींनी यावेळी योगी सरकारला विचारला.

सपा-बसपा युती अभेद्य रहाणार असल्याचं स्पष्ट करताना मायावती म्हणाल्या की, “फुलपूर आणि गोरखपूरमधील पराभवाची त्यांना (भाजपला) धडकी भरली आहे. यामुळेच भाजपने राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी जीवाचं रान केलं. जेणेकरुन बसपा आणि समाजवादी पक्षाची जवळीक कमी करता येईल.”

“राज्यसभा निवडणुकीतील कालच्या निकालानंतर समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्यातील युतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे भाजप आणि कंपनीने युती तोडण्याचे प्रयत्न करु नयेत.” असा इशाराही मायावतींनी यावेळी दिला.

तसेच, भाजप, ईडी, सीबीआय यांचा गैरवापर करत असल्याचाही आरोप मायावतींनी यावेळी केला. पण तरीही आमच्या आमदारांनाही कशाचीही भीती न बाळगता मतदान केले. केवळ एकाच आमदाराने क्रॉस वोटिंग केलं, त्या आमदाराला आम्ही पक्षातून निलंबित केल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मायावती म्हणाल्या की, “भाजपने जाणूनबुजून आपला एक उमेदवार अनिल अग्रवाल यांच्या रुपाने निवडणुकीत उतरवला होता. वास्तविक, भाजपची ही जुनी खेळी आहे. ते पैशांचा नेहमी वापर करतात. दहव्या उमेदवारामुळेच आमदारांची मतं फोडणं शक्य झालं.”

दरम्यान, काल  राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांच्या निवडणुकीत नऊ जागा जिंकत भाजपने अभूतपूर्व यश मिळवलं. यूपीमधील पोटनिवडणुकांत झालेल्या पराभवाचा वचपाच सत्ताधारी भाजपने काढला.

यूपीशिवाय पश्चिम बंगालमधील 5, कर्नाटकच्या 4, तेलंगणाच्या 3, झारखंडच्या 2, तर छत्तीसगड आणि केरळमधील प्रत्येकी एका जागेचा निकाल हाती आला. कर्नाटकात काँग्रेसने 3 तर भाजपने 1 जागा मिळवली.

संबंधित बातम्या

राज्यसभा निवडणूक : यूपीमध्ये भाजप 10 पैकी 9 जागांवर विजयी