जम्मू-काश्मीर : पाकिस्ताननं काल (बुधवार) केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. तर काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकरही शहीद झाले होते. याचाच बदला आज (गुरुवार) बीएसएफनं घेतला.


बीएसएफच्या जवानांनी आज तब्बल 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं. बीएसएफ जवान राधापद हाजरा यांना काल त्यांच्या वाढदिवशीच वीरमरण आलं होतं. याचाच बदला बीएसएफच्या जवानांनी घेतला. यावेळी बीएसएफच्या कारवाईत 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार झाले आहेत.

बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानच्या तीन मोर्टार रेंज आणि पाकिस्तानच्या चौक्याही उद्ध्वस्त केल्या आहेत. भारताच्या या थेट कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याला बरंच नुकसान झालं आहे.

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाढदिवशीच जवान शहीद

पाकिस्तानकडून काल (बुधवार) पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं. यावेळी काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असणारा एक सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला.

राधापद हाजरा असं या जवानाचं नाव असून दुर्देवानं कालच त्यांचा वाढदिवस होता. सांबा सेक्टरमधील सीमरेषेजवळ ते तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयातही नेण्यात आलं. पण तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

शहीद जवान आर पी हाजरा हे प. बंगालमधील मुर्शिदाबादमधील असून कालच त्यांचा वाढदिवसही होता. तब्बल 27 वर्ष ते बीएसएफमध्ये कार्यरत होते. त्यांना एक 21 वर्षाची मुलगी आणि 18 वर्षांचा मुलगा आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं.

संबंधित बातम्या :

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, वाढदिवशीच जवान शहीद