राज्यसभेत शरद पवार काय म्हणाले?
"ब्रिटीश महार रेजिमेंट आणि पेशवे यांच्यात युद्ध झालं होतं. त्या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला होता. हे युद्ध ज्या ठिकाणी झालं, त्या ठिकाणी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी राज्यभरातील दलित बांधव श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी येतात. मागील 50 वर्षात भीमा-कोरेगावमध्ये कोणतीही छोटी-मोठी अनुचित घटना घडली नव्हती.
रस्त्यात जी गावं आहेत, ती गावं या विजयस्तंभाकडे येणाऱ्यांना प्रत्येक प्रकारची मदत करतात.
जवळच्या वढू या गावात, दोनशे वर्षापूर्वी शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मोघलांनी केली होती. त्यांची समाधी वढूमध्ये आहे.
संभाजींच्या समाधीचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं, ते दलित समाजाचे होते. त्यांचीही समाधी तिथेच आहे.
दुर्दैवाने एक महिन्यापूर्वी काही समाजकंटकांनी तिथे विध्वसंक काम केलं. त्या समाजकंटकांचं मी नाव घेणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारने त्यांची नावं आरोपी म्हणून घेतली आहे. त्यांची नावं काही वेळापूर्वी सभागृहात रजनीताईंनी घेतली होती, (संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे) त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत आणि न्यायालयीन चौकशीही होणार आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणं उचित ठरणार नाही.
मी इथे एक सांगू इच्छितो, तिथे दलित व्यक्तीची जी समाधी आहे, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न काहींनी केला. त्याची प्रतिक्रिया नंतर उमटली. मग 1 जानेवारीला लाखोच्या संख्येने लोक तिकडे गेले. त्यावेळी त्यांच्यावर दगडफेक झाली. मला वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमणार हे माहित असल्याने, तिकडे जास्त लक्ष देणं आवश्यक होतं. ते दिलं गेलं नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली.
महाराष्ट्रात दोन-तीन दिवसात अनेक शहरात दगडफेक झाली, हल्ले झाले. पण आता जे झालं ते झालं, आता लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी. यासाठी दोन्ही समाजातील लोकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असं शरद पवार म्हणाले.
VIDEO: