नवी दिल्ली : ऊन, वारा, पाऊस... कशाचीही तमा न करता आपले सैनिक सीमेवर कसा खडा पहारा देत आहेत, याचे फोटो सीमा सुरक्षा दलाने जारी केले आहेत. हे फोटो पाहून आपल्या जवानांबद्दलचा आदर आणखीच वाढेल. पुरामध्ये चार ते पाच फुटांपर्यंतच्या पाण्यात हे जवान आपल्या मातृभूमीचं रक्षण करत आहेत.

देशाच्या अनेक राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अशा अनेक परिसरात पाच फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. परंतु अशा कठीण स्थितीतही पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांचे काही फोटो समोर आले आहेत.



बीएसएफने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात छातीपर्यंत पाण्यातही बीएसएफ जवान सीमेवर खडा पहारा देत आहेत. 'बॉर्डरवर आणखी एक दिवस,' असं बीएसएफने फोटो शेअर करताना लिहिलं आहे.

https://twitter.com/BSF_India/status/896392637145423872

बीएसएफ जवानांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर अनेक ट्विटराईट्सनी प्रतिक्रियाही दिली आहे. 'बीएसएफ जवान खरे भारताचे हिरो आहेत,' असं एका युझरने लिहिलं आहे. तर 'तुम्ही अशाप्रकारे देशाची सेवा करता आणि मंत्री तसंच देशातील लोक एसीमध्ये राहतात, याची मला लाज वाटते,' असं ट्वीट आणखी एका युझरने केलं आहे.


सुरक्षेच्या कारणात्सव हे फोटो नेमके कुठले आहेत, याबाबत बीएसएफने काहीही स्पष्ट केलेलं नाही. पण पाण्यात राहून अशा परिसरात पहारा देणं अतिशय आव्हानात्मक असतं. यामुळे जवानांची तब्येत बिघडू शकते. शिवाय साप, विंचू चावण्याचाही धोका असतो.