नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये झालेल्या चौकशीत बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तेज बहाद्दूर दोषी ठरले आहेत. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन बीएसएफ जवांनाना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची तक्रार तेज बहाद्दूर यांनी केली होती. तेज बहाद्दूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर तेज बहाद्दूर यांनी आणखी एक व्हिडीओ करुन छळ सुरु असल्याचा आरोपही केला होता.
मात्र बीएसएफने तेज बहाद्दूर यांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. खोटी तक्रार करुन बीएसएफची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप तेज बहाद्दूर सिंह यांच्यावर होता. कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये ज्या जवानांची चौकशी केली, त्यापैकी कोणीही निकृष्ट जेवण दिलं जात असल्याची तक्रार केलेली नाही.
तर दुसरीकडे तेज बहाद्दूर यांना धमकी दिली जात असून त्यांचा मानसिक छळही सुरु असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
तेज बहाद्दूर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकाराचा अहवाल मागवला. तेज बहाद्दूर यांच्याविरोधात बेशिस्तपणासह अनेक आरोपांची चौकशी सुरु होती. तसंच स्वेच्छानिवृत्तीची याचिकाही फेटाळली होती.
कोण आहेत तेज बहाद्दूर यादव?
तेज बहाद्दूर यादव हे बीएसएफचे जवान आहेत. त्यांनी भारतीय सैन्यदलातील असुविधांबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता.
या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. आम्ही सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत तेज बहादूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे.
“आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.”, असे सांगताना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं होतं.
संबंधित बातम्या
व्हायरल सत्य : तेज बहाद्दूर यांचा मृत्यू झाला की नाही?
‘मी बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले’, जवानाचा बीएसएफला सवाल
जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप
VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल