जम्मू: जम्मूच्या सांबा भागात पाकिस्तानी घुसखोराचा घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफच्या जवानांनी हाणून पाडला आहे. बीएसएफच्या गोळीबारात एका पाकिस्तानी घुसखोराचा मृत्यू झाला आहे. भारतीय जवानांनी त्याचे प्रेत ताब्यात घेतलं असून त्याच्याबाबत तपास सुरु केला आहे.


बीएसएफच्या जवानांनी जम्मूच्या सांबा सेक्टरमधील बीओपी चक फकीरा क्षेत्रात बीपी नंबर 64 च्या जवळ या घुसखोराला मारले आहे. अनेकदा आवाहन करुनही तो घुसखोर बीएसएफला प्रतिसाद देत नव्हता. तशाही परिस्थितीत तो घुसखोर संशयास्पद वर्तवणूक करत असल्याचं दिसल्यानं त्याला ठार मारण्यात आले.


सकाळी 9.45 मिनीटांच्या सुमारास बीएसएफच्या जवानांना बीपी नंबर 64 च्या जवळ एक घुसखोराची संशयास्पद हालचाल होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर बीएसएफने त्या घुसखोराला शरण येण्यास वारंवार सांगितल्यानंतरही त्या घुसखोराची संशयास्पद हालचाली सुरुच होत्या. नंतर त्या घुसखोराना बीएसएफच्या जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्याला ठार केलं.


जम्मू-काश्मीरः पाकिस्तानचा आणखी एक धोकादायक कट उधळला; BSF ने कठुआ जिल्ह्यात शोधला बोगदा


आता या घुसखोराचे प्रेत ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे काही सापडते का हेही पाहण्यात येतंय. तसेच हा घुसखोर कोणत्या मार्गाने आला होता, त्याचे नियोजन काय होते याचाही तपास सुरु आहे.


महत्वाचं म्हणजे याच भागात 23 नोव्हेंबर 2020 साली एका पाकिस्तानी घुसखोराला मारण्यात आलं होतं. त्यानंतर घुसखोर ज्या बोगद्यातून येतात त्याचाही तपास लावण्यात बीएसएफला यश आलं होतं. या भागात पाकिस्तानी घुसखोरीच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे बीएसएफने या भागात अशा बोगद्यांच्या मार्गांचा तपास लावण्याची मोहीम सुरु केली आहे.


जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला काही दिवसांपूर्वीच आणखी एक भूमिगत बोगदा सापडला होता. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मार्फत घुसखोरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) आणखी एक भूमिगत बोगदा तयार केल्याचे समोर आले आहे.  विशेष म्हणजे, याच सेक्टरच्या बोबियान गावात 13 जानेवारीला 150 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता.


ASP 'टिंकी' ला मुझ्झफ्फरनगर पोलिसांची अनोखी श्रद्धांजली, 49 गुन्ह्यांचा लावला होता तपास