कठुआ : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला आणखी एक भूमिगत बोगदा सापडला आहे. बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, शनिवारी पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मार्फत घुसखोरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) आणखी एक भूमिगत बोगदा तयार केल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले, हा गुप्त बोगदा हिरानगर सेक्टरच्या पानसर भागात सीमा चौकीवर कारवाई दरम्यान सापडला आहे.


गेल्या दहा दिवसांत बीएसएफला हिरानगर सेक्टरमध्ये अशा प्रकारचा दुसरा भूमिगत बोगदा सापडला आहे. सांबा व कठुआ जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांतील हा चौथा बोगदा आणि गेल्या दशकातील दहावा आहे. विशेष म्हणजे, याच सेक्टरच्या बोबियान गावात 13 जानेवारीला 150 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा नवीन बोगदा पाकिस्तानच्या बाजूने 150 मीटर लांबीचा आणि सुमारे 30 फूट खोल आणि तीन फूट व्यासाचा असल्याचे समजते.




पाकिस्तानकडून वारंवार दहशतवाद्यांना भारतात पाठवून घातपात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानचं कोणतंही षडयंत्र पूर्ण होऊ दिलं नाही.


भारतीय सुरक्षा रक्षकांच्या चोख बंदोबस्तामुळे पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत आहे. काही दिवसांपूर्वी अशी माहिती मिळाली होती की आता पाकिस्तानचे दहशतवादी गट जम्मू आणि त्याच्या आसपासच्या भागात ऑनलाइन भरतीत गुंतले आहेत. मात्र, याबाबतही भारतीय जवान सावध आहेत.