नवी दिल्ली: फेसबूक व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप करणारा जवान तेज बहादूर यादव यांनी 'एबीपी न्यूज'शी खास बातचीत केली. यावेळी तेज बहादूर म्हणाले की, 'जर मी चूक आणि बेशिस्त होतो तर मला अवॉर्ड का देण्यात आला होता?, मी बीएसएफचा गोल्ड मेडलिस्ट आहे. मला अनेकदा पुरस्कार देण्यात आले आहेत.' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'आपण यासंबंधी आधीही तक्रार केली होती. पण तरीही काहीच कारवाई झाली नाही तेव्हा नाईलाजानं मला हा व्हिडिओ टाकावा लागला.' असं तेज बहादूरनं स्पष्ट केलं.

एबीपी न्यूजशी बोलताना तेज बहादूर म्हणाला की, 'मी माझ्या कंमाडर या प्रकरणी तीन ते चार वेळा तक्रार केली होती. पण तरीही कोणती कारवाई झाली नाही तेव्हा मला हा व्हिडिओ टाकावा लागला. हो मी व्हिडिओ पोस्ट केला. पण सत्य दाखवणं चुकीचं आहे? मी फक्त देशाच्या नागरिकांना सत्य दाखवलं आहे. 80% तक्रारी या तोंडी केल्या जातात. त्यामुळे मी देखील आजवर अशाच प्रकारे तक्रार केली होती.'

'मी ज्या ठिकाणी होतो तिथं कोणताही मीडिया नाही किंवा इतर साधनं नाही. अधिकारीही जेव्हा येतात तेव्हा त्यांना जवानांना भेटण्यात फार रस नसतो. त्यामुळे मी जे काही दाखवलं आहे तो ग्राऊंड रिपोर्ट आहे. मी तेच जेवण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे जे मला दिलं होतं.' असं तेज बहादूर म्हणाला.

मला आता पोस्टवरुन बटालियन हेडक्वॉर्टरला शिफ्ट केलं आहे. माझं कमाडेंटशी बोलणं झालं. तेव्हा त्यांनी मला विचारलं की, 'तुम्ही असं काही केलं आहे का?', मी हो म्हटलं. पाहुयात पुढे काय होतं.'

दरम्यान, तेज बहादूर बेशिस्त असल्याचा आरोप बीएसएफकडून लावण्यात आला आहे. त्याबाबत बोलताना तेज बहादूर म्हणाले की, 'जर मी चुकीचा होतो किंवा बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले गेले? मी बीएसएफच्या सुवर्णपदक विजेता आहे. मला अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत.'

'तेज बहादूरला मद्यप्राशन करण्याची वाईट सवय जडली होती', बीएसएफकडून जवानावर पलटवार:

दरम्यान, या प्रकरणी बीसएफकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, ‘सुरुवातीच्या दिवसात तेज बहादूर यादवला नियमित काउंसलिंगची गरज होती. तो न सांगता बऱ्याचदा ड्युटीवर गैरहजर असायचा. त्याला दारु पिण्याचीही वाईट सवय जडली होती. त्याला जास्तीत जास्त वेळ मुख्यालयाजवळ ड्युटी दिली जात होती. पण, मागील 10 दिवसापूर्वी त्याला बॉर्डरवर पाठविण्यात आलं. कारण की, त्याचं काउंसलिंग नीट झालेलं आहे की, याची चाचपणी केली जावी यासाठी त्याला तिथे पाठविण्यात आलं होतं.’ असं या पत्रकात म्हटलं आहे.

याच दरम्यान, बीएसएफचे माजी प्रमुख प्रकाश सिंह यांनी जवानाच्या हेतूबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरणं:

जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत बीएसएफच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे.



“आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.”, असे सांगतना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं आहे.



राजनाथ सिंह यांच्याकडून चौकशीचे आदेश:


या प्रकरणाची दखल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन सांगितले, “बीएसएफ जवानाचा व्हिडीओ पाहिला असून, संपूर्ण रिपोर्ट मागवला आहे आणि योग्य कारवाईचे आदेशही दिले आहेत.”

संबंधित बातम्या:

जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप


 

VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल