नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील सीमेवर असणाऱ्या बीएसएफच्या जवानानं काल एक व्हिडिओ पोस्ट करुन चांगलीच खळबळ माजवली. तेज बहादूर यादव या जवानानं थेट लष्करी अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले होते. दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशीचेही आदेश दिले आहेत. मात्र, बीएसएफचे माजी प्रमुख प्रकाश सिंह यांनी जवानाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत.


अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करणारे तेज बहादूर यादव यांच्याबाबत मात्र, काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सुत्रांच्या मते, बीएसएफच्या जवानाची आतापर्यंतची कारकीर्द बरीच वादात राहिली आहे. 20 वर्षाच्या सेवेमध्ये त्याला 4 वेळा कडक शिक्षाही भोगावी लागली आहे. आपल्याच सहकाऱ्यावर बंदूक रोखल्याचाही आरोप तेज बहादूर यादववर करण्यात आला आहे.

तेज बहादूरला मद्यप्राशन करण्याची वाईट सवय जडली होती: बीएसएफ

दरम्यान, या प्रकरणी बीसएफकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'सुरुवातीच्या दिवसात तेज बहादूर यादवला नियमित काउंसलिंगची गरज होती. तो न सांगता बऱ्याचदा ड्युटीवर गैरहजर असायचा. त्याला दारु पिण्याचीही वाईट सवय जडली होती. त्याला जास्तीत जास्त वेळ मुख्यालयाजवळ ड्युटी दिली जात होती. पण, मागील 10 दिवसापूर्वी त्याला बॉर्डरवर पाठविण्यात आलं. कारण की, त्याचं काउंसलिंग नीट झालेलं आहे की, याची चाचपणी केली जावी यासाठी त्याला तिथे पाठविण्यात आलं होतं.' असं या पत्रकात म्हटलं आहे.

याच दरम्यान, बीएसएफचे माजी प्रमुख प्रकाश सिंह यांनी जवानाच्या हेतूबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरणं:

जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत बीएसएफच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे.



“आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.”, असे सांगतना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं आहे.



राजनाथ सिंह यांच्याकडून चौकशीचे आदेश:

 

या प्रकरणाची दखल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन सांगितले, “बीएसएफ जवानाचा व्हिडीओ पाहिला असून, संपूर्ण रिपोर्ट मागवला आहे आणि योग्य कारवाईचे आदेशही दिले आहेत.”

एबीपी माझाने या व्हिडीओची सत्यता पडताळली नाही.

संबंधित बातम्या:

VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल