नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत बीएसएफच्या एका जवानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे.


"आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.", असे सांगतना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं आहे.


या प्रकरणाची दखल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी घेतली आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन सांगितले, "बीएसएफ जवानाचा व्हिडीओ पाहिला असून, संपूर्ण रिपोर्ट मागवला आहे आणि योग्य कारवाईचे आदेशही दिले आहेत."

https://twitter.com/rajnathsingh/status/818493336965128193

सैनिक सीमेवर रात्रंदिवस पहारा देतात म्हणून देशातील जनता निश्चितंपणे जगते. जेव्हा एखादा सैनिक शहीद होतो, त्यावेळी त्याच्या बलिदानाबद्दल अश्रू वाहिले जातात, मात्र, सीमेवर सैनिक कसे दिवस काढतात, कसे जगतात, याचा आपण कधी विचार करतो का? तर नाही. मात्र, बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर जवानांच्या खाण्या-पिण्याची कशा दुरावस्था आहे, हे लक्षात येईल.

एबीपी माझाने या व्हिडीओची सत्यता पडताळली नाही.