श्रीनगर (जम्मू काश्मीर) : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळील आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या दिशेने गोळीबार झाला. या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल शहीद झाले. शिवाय, एका कॉन्स्टेबलसह तीन सर्वसामान्य नागरिकही जखमी झाले आहेत.


काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने जम्मूमधील आर एस पुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु केला. दहाहून अधिक भारतीय चौक्यांवर निशाणा साधला. पाकच्या या भ्याड हल्ल्याला भारतानेही सडेतोड उत्तर दिले.

पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश शहीद झाले. ए. सुरेश हे मूळचे तामिळनाडूतील धर्मपुरीचे होते. याच गोळीबारात ओदिशामधील कॉन्स्टेबल दुबराज मुर्मु जखमी झाले.

परिसरात हाय अलर्ट जारी

पाकिस्तानच्या गोळीबारानंतर या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिसरातील रुग्णालयांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या दिशेने झालेली गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.  3 जानेवारीला झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला होता. त्यानंतर तीन दिवसांआधीच भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सात जवानांचा खात्मा केला होता. त्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आणि त्यांनी पुन्हा सीमेवर गोळीबार सुरु केला.

कधी सुधारणार पाकिस्तान?

2017 मध्ये पाकिस्तानने तब्बल 881 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तरादाखल भारताकडून केलेल्या कारवाई पाकिस्तानचे 138 जवान ठार झाले. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येतो. पाकिस्तानकडून आतापर्यंत 310 वेळा दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.