मुंबई : 10 रुपयांच्या सर्व नाण्यांबाबत आज (बुधवार) रिझर्व बँकेने मोठी घोषणा केली आहे. काही व्यापारी 10 रुपयांची नाणी घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून रिझर्व बँकेकडे आल्या होत्या. त्यानंतर याबाबत रिझर्व बँकेने 10 रुपयाची 14 डिझाइनची सर्व नाणी वैध असल्याचं स्पष्ट केलं आहे.


यासंबंधी रिझर्व बँकेने एक निवेदन जारी केलं. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 'रिझर्व बँकेच्या असं निदर्शनास आलं आहे की, अनेक ठिकाणी काही लोक किंवा व्यापारी 10 रुपयांचे नाणे स्वीकारत नाही. पण आतापर्यंत 10 रुपयांची जी 14 वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आहेत ती सर्व वैध आहेत.'


'10 रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्यायोग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो.' असंही रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे.

ही सर्व नाणी वेगवेगळ्या फीचर्समध्ये आहेत. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विविध पैलू प्रदर्शित होतात. त्यामुळे वेळोवेळी ही वेगवेगळ्या डिझाईनची नाणी चलनात आणली गेली आहेत. असं रिझर्व बँकेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच सर्व बँकांनी 10 रुपयांची नाणी स्वीकारावीत असे आदेश रिझर्व बँकेने दिले आहेत.