Brij Bhushan Sharan Singh News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा (Gonda) येथील भाजप (BJP) खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट किंवा लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, पण विनेश फोगट (Vinesh Phogat) आणि बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांचीही टेस्ट व्हायला हवी, अशी अटही त्यांनी घातली आहे.


बृजभूषण शरण सिंह पुढे म्हणाले की, "जर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया त्यांची टेस्ट करण्यास तयार असतील, तर पत्रकारांना बोलावून त्यासंदर्भात घोषणा करा. मी त्यांना वचन देतो की, मीही यासाठी तयार आहे." तसेच, पुढे बोलताना त्यांनी ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम असल्याचं सांगितलं. "मी यापूर्वीही माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि यापुढेही या वक्तव्यावर ठाम राहीन हे मी माझ्या देशवासियांना वचन देतो." दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करुन यासंदर्भात मागणी केली. 



मी कोणतंही गैर कृत्य केलेलं नाही : बृजभूषण शरण सिंह


याआधी बृजभूषण शरण सिंह यांनी शनिवारी वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, "मी एके दिवशी सांगितलं होतं की, मी कोणतही गैर कृत्य केलेलं नाही आणि त्याबाबत मला कोणतीही भिती नाही. एक दिवस मी तुमच्यासोबत भाऊ, मुलगा, काका सर्व नाती जोडू शकतो, तुमच्यासाठी कोणत्याही क्षणी मदतीला धावून येऊ शकतो, पण याचा अर्थ माझ्यावर केलेले आरोप बरोबर आहेत असं नाही. अजूनही मी सर्व गोष्टी सर्वांसमोर नाही बोलत आहे." 


जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन 


कुस्तीपटू गेल्या 28 दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Wrestler Protest: अखेर दिल्ली पोलिसांसमोर बृजभूषण सिंह हजर, जबाब नोंदवला आरोप मात्र फेटाळले