Bengaluru Heavy Rain: कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये वळीव पावसाने अक्षरश: कहर केला. या पावसाने धावणारे शहर पूर्णत: ठप्प झाले. दोन तास  पावसाने घातलेल्या धुमशानात भुयारी मार्गात पाणी साचून कार बुडाल्याने इन्फोसिसमधील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. भानू रेखा असे त्या महिलेचे नाव आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 23 वर्षीय महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. शहरातील केआर सर्कल भागातील जलमय अंडरपासमध्ये ही घटना घडली. 






मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. बेंगळुरूच्या अनेक भागात गारपीटही झाली. अनेक भागात पाणीच पाणी साचले आहे. बेंगळुरूमधील विद्यारण्यपुरा येथे अतिवृष्टीमुळे शहरातील एक जुनी बहुमजली इमारत कोसळली. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अनेक यूजर्स पावसासोबत गारांचा फोटो शेअर करत आहेत. ट्विटरवर व्हिडिओ आणि फोटोंचा महापूर आला आहे. 






विजयवाड्याचे कुटुंबीय


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील हे कुटुंब भाड्याने कार घेऊन बेंगळुरूमध्ये फिरायला आले होते. अंडरपासमधील पाण्याची पातळी लक्षात न घेता कार चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत कार पाण्यात बुडाली होती. गाडीत बसलेल्या लोकांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर आजूबाजूच्या लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कारमधील दोन प्रवाशांना आपत्कालीन सेवा कर्मचार्‍यांनी बाहेर काढले, तर इतरांना शिडी वापरून बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे भानुरेखा यांना मृत घोषित करण्यात आले. ती इन्फोसिसमध्ये काम करत होती.






इतर महत्वाच्या बातम्या