Brij Bhushan Sharan Singh On Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात अनेक गंभीर आरोप करत कुस्तीपटूंनचं आठवडाभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर धरणं आंदोलन सुरू आहे. ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलक कुस्तीपटूंची मागणी आहे. या सर्व मुद्द्यावर भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी एबीपी न्यूजशी खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी आपली बाजूही मांडली आहे. तसेच, कुस्तीपटूंकडून सातत्यानं होणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात बोलताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं तर मी तात्काळ राजीनामा देईल, असंही ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे.
एबीपी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात पत्रकार परिषदेत सहभागी होताना ते म्हणाले, "मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. मी निर्दोष आहे, हे मला माहित आहे आणि मी कोणत्याही तपासाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे."
राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, "मी राजीनामा देत नाही कारण या लोकांनी माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत आणि मी गुन्हेगार म्हणून कसा जगू?" यासोबतच या लोकांनी कधीही राजीनामा मागितला नाही, असंही ते म्हणाले.
ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही लावलेत गंभीर आरोप
ब्रिजभूषण यांनी एबीपी न्यूजशी बोलताना कुस्तीपटूंच्या आंदोलनावरही अनेक गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर केले जाणारे आरोप गंभीर असून ते षडयंत्र असल्यातंही ते म्हणाले. "यामागे शंभर कोटी रुपये खर्च करण्यात आले असून दीपेंद्र हुड्डा यांच्यासोबत एक मोठा उद्योगपतीही यात सामील आहे. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर दाखवा, मी राजीनामा देईन.", असंही ब्रिजभूषण सिंह म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही राजीनामा द्या, तर तुम्ही राजीनामा द्याल का? यावर बोलताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले की, "पंतप्रधआन नरेंद्र मोदी म्हणाले तर मी लगेच राजीनामा देईल. केवळ पंतप्रधानच नाहीतर अमित शाह, जेपी नड्डा यांच्यापासून कोणीही पक्षात म्हटलं तरी मी राजीनामा देईल."
कायद्याचा निकाल मान्य : ब्रिजभूषण सिंह
ब्रिजभूषण सिंह बोलताना म्हणाले की, "जोपर्यंत न्यायालय मला दोषी ठरवत नाही तोपर्यंत मी दोषी नाही. कायद्याचा निर्णय मान्य केला जाईल. मी कधीच काही चूक केली नाही आणि करणारही नाही. माझ्या लोकप्रियतेच्या विरोधात कटकारस्थानं केली जात आहेत. "राजकारणावर चर्चा करताना ते म्हणाले, "उत्तर प्रदेशातील कोणत्याही पक्षानं माझ्याविरोधात वक्तव्य केलेलं नाही. काँग्रेसच्या एकाही नेत्यानं वक्तव्य केलेलं नाही."