फ्रान्समधील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2019 11:53 PM (IST)
राफेल विमानासंबंधीची माहिती चोरण्याचा हा प्रयत्न असल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. पॅरिस येथील भारतीय वायुसेनेच्या कार्यालयात रविवारी काही लोकांनी शिरण्याचा प्रयत्न केला. राफेल विमानासंबंधीची माहिती चोरण्याचा हा प्रयत्न असल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे. राफेल विमान खरेदीवरुन भारतात गेल्या अनेक दिवसांपासून गदारोळ सुरु आहे. या विमानाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. फ्रान्समध्ये सुरु असलेल्या राफेल विमानाच्या उत्पादनाचे काम पाहण्यासाठी भारतीय वायुसेनेची एक टीम पॅरीसमध्ये आहे. या टीमच्या कार्यालयातच घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे चोरीला गेली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेची स्थानिक पोलीस चौकशी करत आहेत. तसेच संरक्षण मंत्रालयाला देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे.