नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे, त्याआधी देशातील परिस्थिती पाहता गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही पक्षांतील लोकांकडून हिंसा भडकवण्याची विधाने केली जात आहेत, म्हणून गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे.


गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशात कायदा सुव्यवस्था आणि शांतता कायम राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेण्याच्या सूचना गृह मंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या गेल्या आहेत.


स्ट्राँगरुम आणि मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी हिंसाचार भडकवण्याबाबत केलेल्या आणि कायदासुव्यवस्था निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे गृहमंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे.


केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही संघटना आणि राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विषेशत: उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि त्रिपुरामध्ये हिंसा भडकण्याची शक्यता आहे.