ग्वाल्हेर : बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा लवकरात लवकर सील केल्या जाणार आहेत. घुसखोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. सीमेच्या बहुतांश भागात कुंपण घातलं जाईल. जिथे कुंपण घालणं शक्य नसेल, तिथे तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.


ग्वाल्हेरच्या टेकनपूरमध्ये बीएसएफच्या पासिंग आऊट परेडमध्ये राजनाथ सिंह सहभागी झाले होते. त्यावेळी ही माहिती राजनाथ यांनी दिली. देशाच्या सुरक्षेसाठी बीएसएफकडून चोख काम केलं जातं आणि म्हणूनच बीएसएफविषयी जनतेच्या मनात प्रेम आणि विश्वास वाढल्याचं त्यांनी सांगितलं.

'गेल्या अडीच-तीन वर्षात नक्षली हल्ल्यांच्या संख्येत 50-55 टक्क्यांनी घट झाली आहे. यापूर्वी देशातील 135 जिल्हे नक्षलग्रस्त होते, मात्र आता ती संख्या 35 वर आली आहे. या जिल्ह्यांमध्येही नक्षलवादाच्या घटनांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे.' असं राजनाथ सिंह म्हणाले.

राज्य सरकार त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. केंद्र सरकार त्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. निमलष्करी दलाच्या 100 हून अधिक तुकड्या या भागात तैनात असल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.