Booster Dose : भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता लवकरच कोविड लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट म्हणजेच NTAGI हे अंतर कमी करण्यासाठी शिफारस करू शकते, ज्यावर 29 एप्रिल रोजी बैठक होणार आहे.


9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत अंतर कमी
ICMR च्या तपासणीत असे आढळून आले आहे की, सुरुवातीच्या लसीकरणानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर अँटीबॉडीजची पातळी कमी होऊ लागते. बूस्टर डोस दिल्याने रोगप्रतिकारशक्तीची क्षमता वाढते. यामुळे, लसीकरणाचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.


बूस्टर डोसवर वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात...


दिल्लीच्या एलएनजेपी हॉस्पिटलचे एमडी डॉ सुरेश कुमार यांनी या संदर्भात सांगितले की, कोविड लसीचा सावधगिरीचा डोस म्हणजेच बूस्टर डोस हा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. म्हणूनच प्रत्येकाने बूस्टर डोस घ्यावा, जेणेकरुन आपण आपल्या कुटुंबाला आणि समाजाला या महामारीपासून वाचवू शकाल.


लसीकरणानंतर रुग्णांच्या संख्येत घट


डॉक्टर म्हणाले की, “कोरोनाच्या दोन डोसनंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतांश लोक असे आहेत ज्यांचे लसीकरण अपूर्ण आहे. त्याच वेळी, कुटुंब आणि समाजाच्या संरक्षणासाठी तिसरा डोस महत्त्वाचा आहे. 


4-5 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ


 गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरही डॉक्टरांनी भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या 4-5 दिवसांपासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून सकारात्मकतेचा दर 4-5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आमच्याकडे दोन मुले आणि 10 प्रौढांसह 12 रुग्ण दाखल आहेत. एक मुलगा आजारी असून आम्ही त्याला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे.


महाराष्ट्रात मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती


कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्यात पुन्हा मास्कसक्ती (Mask Mandatory) करावी अशी मागणी सर्व जिल्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे (CM Uddhav Thackeray) केली आहे. राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णांसदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मास्कच्या विषयावर चर्चा झाली. दरम्यान नागरिकांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात जनजागृती करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.