हैदराबाद : मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक रक्ताची शोधाशोध करत होते. हैदराबादेतील एका रक्तपेढीचं नाव त्यांना सुचवण्यात आलं. त्यांनी संबंधित रक्तपेढीतून जेव्हा रक्त आणलं तेव्हा त्या रक्तामध्ये सलाईनचं मिश्रण करण्यात आलेलं असल्याचं उघड झालं.


हैदराबादमध्ये रक्तातही भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हेनस रक्तपेढीवर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतलं. रक्ताचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सायबराबादचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी याबाबत माहिती दिली.

नरसिम्हा रेड्डी यांचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांना एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र रुग्णाला रक्ताची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

नातेवाईकांना रक्ताची शोधाशोध केल्यानंतर व्हेनस रक्तपेढीतून रक्ताची दोन पॉकेट खरेदी करण्यात आले. एका पॉकेटची किंमत 3 हजार रुपये एवढी होती. मात्र डॉक्टरांनी रक्त रुग्णासाठी वापरण्यापूर्वी तपासणी केली असता रक्तामध्ये सलाईनची भेसळ करण्यात आली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं.

रक्तपेढ्यांवर औषध नियंत्रण संघटनेचं नियंत्रण असतं. मात्र अधिकाऱ्यांकडून रक्तपेढ्यांची नियमित चाचणी केली जाते का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कारण अशा प्रकारचं प्रकरण समोर येण्याची ही दुसरी वेळ आहे.

यापूर्वीही सुलतान बाजार येथील सरकारी रुग्णालयात असंच प्रकरण समोर आलं होतं. मात्र भेसळीच्या या धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण दुधापासून ते रक्तापर्यंत सगळीकडे भेसळ चालू आहे. आपण काय पितो आणि काय खातो, याची कल्पना आपल्यालाही नाही.