मुंबई : एकीकडे अल निनोचा प्रभाव वाढत असताना दुसरीकडे यंदाचा उन्हाळा हा आतापर्यंतचा सर्वात तापदायक उन्हाळा ठरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सर्वच शहरांमध्ये आतापर्यंतच्या कमाल तापमानापेक्षा एक अंश सेल्सिअस जास्त असण्याचा अंदाज आहे.


यंदाच्या जानेवारी महिन्यातील तापमान हे आतापर्यंतच्या जानेवारी महिन्यातील तापमानापेक्षा 0.67 अंश सेल्सिअसने अधिक होतं. त्यावरुन हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.



2016 वर्ष हे 1991 पासूनचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं होतं. मागील वर्षी वातावरण बदलामुळे 1600 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 700 जण उष्णतेच्या लाटेने दगावले. यातील सर्वाधिक 400 जणांचा मृत्यू आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये झाला होता.

भारताच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट असेल, असं शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, उडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे.