शंकरसिंह वाघेला या काँग्रेसच्या बड्या नेत्यानं नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या बंडाळीचा फायदा घेत अहमद पटेल यांची राज्यसभेतली वाट बिकट करण्याचा भाजपचा डाव आहे.
गुजारातच्या 182 आमदारांच्या विधानसभेत भाजपकडे 121 आमदार असल्यानं अमित शाह, स्मृती इराणी हे भाजपचे राज्यसभेचे दोन्हीही उमेदवार आरामात जिंकू शकतात. जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक आहेत.
गुजरातमध्ये काल काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी दोगा आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटून 57 वरुन 52 वर घसरली आहे. शिवाय राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं काँग्रेसची धास्ती वाढली आहे.
बलवतसिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पीआय पटेल या काँग्रेसच्या तीन आमदारांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. चन्नाभाई चौधरी आणि मान सिंह चौहान यांनी आज काँग्रेस सोडलं. विशेष म्हणजे यातल्याच फुटीर बलवंतसिंह राजपूत यांना भाजपनं राज्यसभेसाठी आपला तिसरा उमेदवार म्हणून जाहीरही करुन टाकलं.
बलवंतसिंह हे गुजरात विधानसभेत काँग्रेसचे व्हिप होते, शिवाय ते शंकरसिंह वाघेला यांचे नातेवाईकही आहेत. वाघेलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असली तरी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले आमदार गळाला लावण्यात यश आलं, तर अहमद पटेल यांची राज्यसभेतली वाट बिकट होऊ शकते.
अहमद पटेल हे गुजरातमधले एकमेव मुस्लिम खासदार आहेत. राज्यसभेतलं संख्याबळ वाढवून मोदींचे हात आणखी मजबूत करण्यासाठी भाजप एकेक खासदार कसा वाढवता येईल, यासाठी कसोशीनं प्रयत्न करतंय.
अहमद पटेल यांचा चुकून पराभव झालाच, तर तो केवळ एक निकाल नसेल. तर काँग्रेससाठी प्रचंड धक्का असेल. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचं नैतिक मनोधैर्य खच्ची करण्यात भाजपला यश येईल. सक्रीय राजकारणात नसले तरी अहमद पटेल हे यूपीएच्या काळात काँग्रेसमध्ये नंबर 2 चं व्यक्तिमत्व मानलं जायचं.
सोनियांच्या राजकीय निर्णयांमध्ये पटेल यांचा सल्ला मोलाचा असायचा. लो प्रोफाईल राहणी पसंत करणारे अहमद पटेल हे पाचव्यांदा राज्यसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या चाणक्याचा पराभव करण्यात भाजपला यश येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान होणार आहे. नितीशकुमार यांच्यासारखा मातब्बर सहकारी यूपीएतून फोडण्यात यश आल्यानंतर, आता अहमद पटेल यांना राज्यसभेत हरवण्यासाठी भाजपनं सापळा लावलाय. राजकारणात किलिंग इन्स्टिक्ट शत्रूला नामोहरम करण्याची अमित शहांची ही शैली यावेळीही परिणामकारक ठरणार का याची उत्सुकता आहे.
गुजरात आणि राज्यसभेचं गणित
- 182 सदस्यसंख्येच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121 आमदार
- काँग्रेस आमदारांची संख्या 57
- मात्र शंकरसिंह वाघेलांसह 5 आमदारांनी सोडचिट्ठी दिल्याने काँग्रेसचं संख्याबळ 52 वर
- राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक
- मात्र काँग्रेसच्या 52 पैकी वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत
- त्यामुळे अहमद पटेल यांना 47 मतांसाठी मोठा संघर्ष करावा लागणार
- राष्ट्रपती निवडणुकीत 11 मतं फुटल्याने काँग्रेसला धास्ती
- राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान